स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२०: सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये 11 व्या बैठकीत काही तोडगा निघू शकतो. केंद्राने शेतकऱ्यांसमोर दोन प्रपोजल ठेवले आहेत. केंद्राने शेतकऱ्यांना म्हटले की, दोन वर्षांसाठी कृषी कायद्यांना थांबवले जाऊ शकते आणि MSP वर चर्चा करण्यासाठी नवीन समितीची स्थापना केली जाईल. परंतु, शेतकरी कायदे परत घेण्यावर अडून आहेत. आता सरकारच्या प्रपोजलवर शेतकरी वेगळी बैठक घेत आहेत.
NIA च्या कृतीवर शेतकऱ्यांना आक्षेप
विज्ञान भवनात जेव्हा कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी 40 शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केली, तेव्हा शेतकऱ्यांनी कायदे परत घेण्याची मागणी केली. लंचदरम्यान शेतकरी म्हणाले की, सरकार आमच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा करत नाहीये. MSP बाबत आम्ही चर्चा सुरू केल्यावर सरकारने कायद्यांबाबत बोलणे सुरू केले. तसेच, शेतकरी नेत्यांनी नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA) कडून आंदोलनाशी संबंधित लोकांना नोटिस पाठवण्याचाही विरोध केला. यावेळी शेतकऱ्यांनी आरोप लावला की, NIA चा वापर शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. यानंतर सरकारने म्हटले की, जर एखाद्या निरपराध शेतकऱ्याला नोटिस पाठवण्यात आली आहे, तर आम्हाला त्यांची लिस्ट द्या, आम्ही या प्रकरणात लक्ष घालू.