महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । मुंबई । कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाले आहे. या दर्जेदार सेवांची आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मंत्रालय, मुख्य इमारत येथील प्रांगणात दिनांक 22 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत माहिती व आरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.

या आरक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळी असलेल्या 29 पर्यटक निवासे, 30 उपहारगृहे यांच्या आरक्षणासंबंधी माहिती देण्यात येत आहे. सोबतच महामंडळाच्या जल पर्यटन विभागामार्फत कार्यान्वित केलेल्या नाशिक बोटक्लब, गणपतीपुळे बोटक्लब व तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ऍक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) या संस्थेबाबत माहिती देण्यात येत आहे.

एमटीडीसीमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना तसेच विविध कक्ष आरक्षणावर सवलत दिली जाते. यामध्ये असलेल्या जेष्ठ नागरीक सवलत, शैक्षणिक सहल सवलत, माजी सैनिक सवलत, दिव्यांग पर्यटक सवलत, अनिवासी भारतीय (NRI) सवलत, शासकीय व निमशासकीय कर्मचारी सवलत याबाबतही माहिती देण्यात येत आहे.

सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच मंत्रालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मंत्रालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या आरक्षण केंद्राला अवश्य भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!