
स्थैर्य, सातारा, दि. 15 नोव्हेंबर :बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकी भारतीय जनता पार्टीने मोठा विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष सातार्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला .येथील मोती चौकामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत पेढे वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, पालिकेतील भाजपच्या माजी पक्षप्रतोद सिद्धी पवार, सुनिषा शहा, अविनाश चिखलीकर, विजय काटवटे, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, विकास गोसावी इत्यादी यावेळी उपस्थित होते. येथील मोठी चौकात सायंकाळी उशिरा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आगमन झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महिला सदस्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना पेढा भरून त्यांचे तोंड गोड केले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी बोलताना म्हणाले, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व अंतर्गत बिहारमध्ये भाजप प्रणित इंडिया आघाडीचा झालेला विजय हा ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. हा विकसित भारताच्या मोदीजींच्या शाश्वत स्वप्नांचा परिणाम आहे. जगात भारताला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने केलेल्या संघटित प्रयत्नांचा हा विजय आहे. हा विजयाचा रथ यापुढे असाच दौडत राहणार आहे आपण सर्वांनी संघटितपणे या प्रयत्नाला साथ देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
