ज्ञानार्जंनासाठी ग्रंथालयाचे महत्व अधोरेखीत : प्राचार्य युवराज गोंडे
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.१३ : सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण ही आवश्यक असल्यानें, हे ज्ञानार्जन व ज्ञान मिळण्यासाठी ग्रंथालय उपयुक्त असल्याचे महत्व डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी पटवून दिले असल्याचे मत प्राचार्य युवराज गोंडे यांनी व्यक्त केले.
स्व.शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली ता. कोरेगावमध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य गोंडे सर बोलत होते. डॉ. रंगनाथन यांचा जन्म दिवस हाच सर्वत्र ग्रंथपाल दिन म्हणून केला जातो. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, त्याकरिता ग्रंथालयाचा विकास, प्रसार होऊन देशांतील सर्व सामान्य लोकांना ज्ञानाची कवाडे खुली करुन वाचन संस्कृती रुजवण्यासाठी डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी महत्वपूर्ण योगदान दिले असे विचार ग्रंथपाल प्रा. प्रवीणकुमार कुंभार यांनी व्यक्त केले. यावेळी लिपिक सागर काटकर, ग्रंथपाल सहाय्यक शिवाजी नावडकर व महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.