विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२३ । मुंबई । विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होईल. या दृष्टीने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सिक्कीम येथील कलाकारांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १६) राजभवन येथे ‘सिक्कीम राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

दिनांक १६ मे १९७५ रोजी सिक्कीम भारताचे २२ वे राज्य झाले. त्या दिवसापासून सिक्कीमने मोठी प्रगती केली असून देशाच्या विकासातदेखील मोठे योगदान दिले आहे. सिक्कीम हे देशातील हरित राज्य असून पर्यावरण रक्षणाबाबत हे राज्य इतर राज्यांकरिता मार्गदर्शक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

उंच बर्फाच्छादित पहाड असलेले सिक्कीम पर्यटकांचे आकर्षण असून येथील निसर्ग सौंदर्य व विविधतेमुळे सिक्कीम म्हणजे स्वर्गीय राज्य आहे. या राज्याने डॅनी डेंग्जोपा, बायचुंग भुतियासारखे रत्न देशाला दिले आहे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी सिक्कीमच्या गुरुंग जमातीचे घाटू नृत्य, सोराती नृत्य, अक्षैमा गीत, तमांग सेलो नृत्य तसेच सिक्कीमच्या वाद्यवृंदाचे सादरीकरणे झाले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक दाखविणारे शिववंदना, लावणी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे देखील यावेळी सादरीकरण करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!