दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्याचे समतोल राखून आपल्या हृदयाला सक्षम बनवा, असे प्रतिपादन डॉ. हनुमंत गावडे यांनी गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, प्राचार्य श्री. गिरीधर गावडे, शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. गावडे मनोगतात म्हणाले की, संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा यांच्या साह्याने हृदयाचे आरोग्य अधिक चांगले ठेवता येईल. तसेच तणाव व चिंतामुक्त जीवन जगून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमात इयत्ता पहिलीतील निलश्री शेडगे या विद्यार्थिनीने हृदय कशाप्रकारे कार्य करते, याची माहिती दिली. शाळेतील शिक्षिका वर्षा दोषी यांनी आपल्या मनोगतात हृदयाचे कार्य व आरोग्य याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
प्राचार्य गिरिधर गावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमात सुरुवातीस डॉ. हनुमंत गावडे यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे मेडिकल चेकअप करून त्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती केल्याने समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सस्ते यांनी केले तर आभार उपप्राचार्या शितल फडतरे यांनी मानले.