रस्त्यावर सोडलेल्या प्राण्यांसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा, कॅप संस्थेचा पुढाकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, ठाणे, दि.१५:  रस्त्यावर सोडण्यात आलेल्या किंवा जखमी अवस्थेत आढळलेल्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना निवारा देणाऱ्या कॅप संस्थेने आपल्या आवडत्या प्राण्यांसोबत व्हॅलेण्टाइन डे साजरा करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला प्रतिसाद देत ठाणे, मुंबईतील प्राणिमित्रांनी व्हॅलेण्टाइन डे आपल्या आवडत्या प्राण्यांसोबत साजरा केला. यात कुत्रा, मांजर आणि गायींचा समावेश होता.

येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी (येस) व सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप)च्या सहकार्यातून जुने वाघबीळ गाव येथे प्रशस्त जागेमध्ये प्राण्यांसाठी ‘फ्रीडम फार्म’ नावाचे निवारा केंद्र उभारणीचे काम सुरू केले आहे. व्हॅलेण्टाइन डेच्या निमित्ताने प्राणिमित्रांनी येथील प्राण्यांची भेट घेता यावी व काही काळ त्यांच्यासोबत घालवून मुक्या प्राण्यांप्रति आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने संस्थेने उपलब्ध करून दिली.

‘तुमच्या जोडीदाराला भेटा’ या संकल्पनेद्वारे फ्रीडम फार्मला भेट दिल्यानंतर कोणाला इकडच्या प्राण्यांना स्वतःच्या घरी अथवा संस्थेमध्ये दत्तक घ्यावयाचे असेल तर तीही व्यवस्था या दिवशी करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला प्रत्यक्ष जागेवर काही कारणाने उपस्थित राहणे शक्य नसेल तर अशा नागरिकांसाठी फ्रीडम फार्मच्या व्हर्च्युअल टूरचेही आयोजन केले होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचे सर्व उपाय योजून सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ७ या दरम्यान दोन गटांमध्ये भेट देण्याऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास ५० प्राणिप्रेमींनी आपला वेळ प्राण्यांसोबत घालविला. प्रत्येकाला ४५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळेत त्यांनी आपल्या आवडत्या प्राण्याला खाऊ घातले, त्यांच्यासोबत काही खेळ खेळले. तसेच सेल्फीही काढले. यात कधीही न बरे होणाऱ्या प्राण्यांचा समावेश होता; परंतु त्यांच्यासोबतही ठाणेकरांनी आपला वेळ व्यतीत केला असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशांक तोमर यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!