पोलीस अधिकार्याने दिलेला शब्द पाळला
स्थैर्य, लोणंद, दि. 22 : लोणंद येथील सुंदरनगर परिसरातील एका इमारतीतील तेरा वर्षाच्या मुलीला आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच करोना झाला होता. त्यावेळी तु बरी होऊन घरी आल्यावर आपण वाढदिवस केक कापून साजरा करु हा दिलेला शब्द आज मुलगी करोना मुक्त होवून घरी परतल्यावर पूर्ण करण्याचे कर्तव्य सपोनि. संतोष चौधरी यांनी केले.
या आगळ्या वेगळ्या प्रसंगाने पोलिसातील माणूस पहायला मिळाल्याने उपस्थित सर्व जण भारावून गेले. तर या मुलीने एका मोठ्या आजाराच्या संकटावर हिमतीने मात करुन कोरोना विरोधातील लढाई जिंकल्याचा आनंद लोणंदकरांना झाल्याचे दिसून आले.
येथील सुंदर नगर परिसरात राहणार्या मुलीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. योगायोगाने त्यादिवशीच तिचा वाढदिवस होता. त्यावेळी वय किती असा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा आजच तीला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच तीचा वाढदिवस असल्याचे घरातील लोकांनी सांगितले होते.
त्या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी एकमेकांकडे पहात काहीवेळ शांत झाले. पण समय सुचकता दाखवत पोलिसाच्या वर्दीत असणारा माणुस बाहेर येऊन सपोनि. संतोष चौधरी यांनी तू बरी होऊन घरी परत आल्यावर तुझा वाढदिवस केक कापून साजरा करू, असा शब्द मुलीला दिला होता.
सदर मुलगी आज रुग्णालयातून बरी होवून हसतमुखाने आपल्या लोणंद येथील घरी परतली. त्यावेळी त्या इमारतीतील शेजार्यांनी व नागरीकांनी फुले उधळत तिचे स्वागत केले. तर लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि. संतोष चौधरी, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले,रोहित निंबाळकर,पो.कॉ फैय्याज शेख,कॉ.अविनाश शिंदे आदींनी आज तीच्या घरी जावून तिचा वाढदिवस केक कापून उत्सहात साजरा केला.
याप्रसंगी मुलीचे आई वडिल,लहान भाऊ,बहिण व नातेवायिक उपस्थित होते. या मुलीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देताना एका मोठ्या आजाराच्या संकटावर धैर्याने मात करुन यशस्वी लढाई जिंकल्याबद्दलही उपस्थितांनी तिचे अभिनंदन केले.
आज पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुस लोणंदकरांनी सपोनि. संतोष चौधरी यांच्या रूपाने पाहिला. चारच दिवसांपूर्वी छत्तीसगडला जाणार्या बावीस मजुरांना एसटीची सोय करून महाराष्ट्राची सीमा असलेल्या गोंदीया पर्यंत पाठवण्याची माणुसकी दाखवली होती. त्यानंतर आजच्या या प्रसंगाने करोना योद्धा असलेल्या खाकी वर्दीची मान सपोनि. संतोष चौधरी यांच्या रूपाने उंचावली गेली.