दैनिक स्थैर्य । दि.१७ ऑगस्ट २०२२ । फलटण । संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिंती ता. फलटण येथे ही विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपला सहभाग नोंदवला. १३ ऑगस्ट व १४ ऑगस्ट रोजी गावातील विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करुन त्यांना ही उत्साहात सहभागी करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी गावातील आजी-माजी सैनिकांच्या हस्ते गावातील ध्वजारोहण केले.
यावेळी सैनिकांनी गणवेषात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गावाच्या वतीने सर्व सैनिकांचा सन्मान करण्यात आला.त्याच प्रमाणे जि.प.प्राथमिक शाळा, आंगणवाडी व श्री जितोबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा तसेच देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. आरोग्य उपकेंद्र जिंती यांच्या माध्यमातून कोविड बूस्टर डोस लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
तसेच हर घर तिरंगा हर घर संविधान हा उपक्रम राबवून सामाजिक संघटनांनी सहभागी होऊन भारतीय संविधानाच्या प्रास्तविकाची फोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पाहून प्रत्येक नागरीकाची छाती गर्वाने आणि आनंदाने फुलून येत होती.
यासाठी ग्रामपंचायत जिंती आणि सर्व तरुण मंडळांनी विशेष मेहनत घेतली व संपूर्ण गावाने सहभागी होत स्वातंञ्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.