आगामी भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने सक्षम होणे आवश्यक – सदगुरू नंदकुमार जाधव
स्थैर्य, सोलापूर, दि. ०६ : ‘कोरोना महामारीचा प्रकोप संपल्यानंतर जीवन त्वरीत पूर्वपदावर येईल’, या भ्रमात न रहाता जनतेने वास्तवाला सामोरे जायला हवे. आज प्रगत अमेरिकेसह अनेक राष्ट्रे मंदीच्या गर्तेत आहेत. अनेक तज्ञांनी पुढे आर्थिक मंदी, बेरोजगारी यांची शक्यता वर्तवली आहे. चीनचा विस्तारवाद आणि पाकिस्तानचा जिहादी आतंकवाद हा भारतावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक मुसलमान राष्ट्रांमध्ये गृहयुद्धे चालू आहेत. राजधानी दिल्लीत सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच जगाचा तिसर्या महायुद्धाच्या दिशेने प्रवास, तसेच नैसर्गिक आपत्ती यांचा विचार करता या काळात आपल्याला स्वतःसह कुटुंबियांचे आणि हिंदु समाजाचे अन् राष्ट्राचेही रक्षण करायचे आहे. यासाठी प्रत्येकाने स्वतःला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करणे, हीच काळानुसार साधना आहे. यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू असलेल्या ‘ऑनलाईन सत्संग मालिकां’चा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा’त ‘आपत्काळात हिंदूंचे कर्तव्य आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर बोलत होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम् या 11 भाषांमध्ये ऑनलाईन पद्धतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि श्री गुरुपूजन यांनी झाला. यू-ट्यूब आणि फेसबूक यांद्वारे ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे देश-विदेशात प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाचा विश्वभरातील 1 लाख 79 हजार जिज्ञासू आणि साधक यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला, तर फेसबूकच्या माध्यमांतून 3 लाख 55 हजारांहून अधिक जिज्ञासूंपर्यंत विषय पोहोचला.
सद्गुरु जाधव पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे गेल्या अनेक वर्षांपासून भावी आपत्काळाविषयी आणि त्यातून तरून जाण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी मार्गदर्शन करत आहेत. श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ अर्थात् ‘माझ्या भक्तांचा नाश होत नाही. ईश्वराची भक्ती केली, तरच ईश्वर संकटकाळात आपले रक्षण करेल, याची खात्री बाळगा !’ धर्माला ग्लानी आली की, पृथ्वीवर पाप वाढते. त्यातून पृथ्वीवरील पाप करणार्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी आपत्काळ आणि युद्धकाळ येत असतात. या आपत्काळानंतर निर्माण होणार्या अनुकूल वातावरणात रामराज्याची म्हणजेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होईल आणि पुन्हा संपत्काळ चालू होईल अर्थात् चांगले दिवस येतील. असे असले, तरी येणार्या आपत्काळातून तरून जाण्यासाठी काळानुसार योग्य साधना करणे क्रमप्राप्त आहे. प्रतिदिन कुलदेवतेचा/इष्टदेवतेचा नामजप करणे, ईश्वराला प्रार्थना करून प्रत्येक कृती करणे आवश्यक आहे.
या वेळी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात सनातनच्या ‘धर्मकार्यासाठी जाहिराती आदी अर्पण मिळवणे, ही समष्टी साधना !’ या मराठी ग्रंथांचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मंगलहस्ते प्रकाशन करण्यात आले.