स्थैर्य, सांगली, दि. 25, : अनेक वर्षाची परंपरा असलेला आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला कडेगाव शहरातील गगनचुंबी ताबूतांचा मोहरम सण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केले. यावेळी त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी व वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करून सोशल डिस्टन्स ठेवून मोहरम सण साधेपणाने साजरा करावा असेही सांगितले.
कडेगाव येथील तहसील कार्यालयात राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहरमच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. यावेळी नागराध्यक्षा नीता देसाई, कडेगाव-पलूसचे प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस, आदि उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, कडेगावच्या मोहरम निमित्त होणारे उंच गगनचुंबी ताबूत व हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा संपूर्ण राज्यात व देशात प्रसिद्ध आहे. परंतु कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. आपल्याकडेही याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशावेळी प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी शासनाच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. मोहरम निमित्त यावर्षी होणारे ताबूत लहान करावेत व मोजक्याच लोकांनी धार्मिक विधी पार पाडावा व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील व पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. तर सर्व ताबूत मालक, मोहरम कमिटी व शहरातील नागरिकांनी शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करीत लहान ताबूत करून मोहरम सण साधेपणाने साजरा करण्याची ग्वाही दिली. यावेळी सर्व ताबूत मालक, मोहरम कमिटीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.