
स्थैर्य, फलटण : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे यंदा गणेश भक्तांना शासनाने घालून दिलेल्या नियम व निकषांच्या अधिन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. गणेशोत्सव काळात पुणे, मुंबईहून येणार्या नातलगांची संख्या वाढती आहे. त्यामुळे अशा नातलगांची आपणास विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जर एखाद्या साखळीकडे दुर्लक्ष झाले व कोरोना संसर्गाची साखळी सुरु झाली तर ती आटोक्यात आणणे अवघड बनते म्हणून प्रत्येकाने सजग रहाणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात सकाळी व संध्याकाळी होणारी आरती, दर्शनासाठी येणारे भक्त व विशेष निमंत्रीतांना बोलाविल्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाय योजना करावी लागणार आहे. गणेश मुर्ती प्रतिष्ठापणेपूर्वी त्या दोन किंवा एक दिवस आगोदर आणाव्यात तसेच गणेश विसर्जनही यंदा सात दिवसांनी अथवा एक, दोन दिवस आगोदर करावे असे आवाहनही फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी केलेले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील लोकसंख्या जास्त असलेल्या गावांमध्ये सद्य परिस्थितीचा विचार करुन ‘एक गाव एक गणपती’ चा विचार प्राधान्याने करावा. या गणेशोत्सवाकडे सर्वांनी एकत्र येत सामाजिक व सामूहिक जबाबदारी म्हणून पहावे असे आवाहन पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूंच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव कसा साजरा करायला हवा यावर शहर व ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक फलटण येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी बरडे यांनी वरील आवाहन केले. यावेळी प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, नितिन सावंत, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक स्वराज संस्था व पोलीस प्रशासन यांच्याकडून आवश्यक परवानग्या घेणे अनिवार्य आहे. जर नियमांचा भंग झाला तर मंडळ व पदाधिकारी यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. गणेश आगमन व विसर्जनाच्या मिरवणूकीवर पुर्णतः बंदी राहणार असून जबाबदारीने वागा व कारवाई टाळा असे आवाहन प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी केले. प्रास्तविक मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक नितिन सावंत यांनी मानले. कार्यक्रमास शहर व ग्रामीण भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.