स्थैर्य, फलटण, दि.१६: गत काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह राज्याच चर्चेचा विषय ठरलेल्या फलटण तहसिल कार्यालयावर आता सी.सी.टी.व्ही.कॅमेर्याचा वॉच राहणार आहे. तहसील कार्यालयात वारंवार होणार्या चोर्यांच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात व बाहेर एकूण 16 लाँग रेंज बुलेट व डोम कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सदरचे कॅमेरे हे अंधारातही उत्तम रित्या काम करतात, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
फलटण तहसिल कार्यालयाअंतर्गत विविध विभाग कार्यरत आहेत. या ठिकाणी तालुक्यातील महसूल विभागाशी निगडीत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी याच कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी संगणकांची चोरी केल्याने मोठी खळबळ माजली होती. या घटनेतील काही मुद्देमाल सापडला असला तरी अद्याप उर्वरित मुद्देमाल व अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे व या ठिकाणच्या सुरक्षेच्या उडालेल्या बोजवार्यामुळे सामान्यांमधून प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रीया उमटत होती. याचीच तातडीने दखल घेवून या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेर्याची अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे आता या भागात घडणार्या अनुचित प्रकारांवर आळा बसेल; अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.