दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२२ । महाबळेश्वर । महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी छापा टाकला. हजारो कोटी रुपयांची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या मार्फत बंगल्यावर हजर झाले आहेत. बंगल्यावर परदेशी पेंटिंग्स पोट्रेट सील करून ताब्यात घेतली जाणार आहे. ज्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे हे पेंटिंग कुठून कसे आणले गेले याची शहनिशा करण्यात येत आहे.
महाबळेश्वरला पाच एकर परिसरात वाधवान यांचा बंगला असून पहिल्या लॉकडाऊन मध्ये वाधवान बंधूंनी तत्कालीन प्रधान सचिन राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. तेव्हापासून वाधवानबंधू ईडीच्या ताब्यात आहेत. या कारवाईबाबत सीबीआयच्या पथकाने अत्यंत गोपनीयता ठेवली होती. मात्र शनिवारी बारा वाजल्यानंतर हे पथक पोलिसांच्या माध्यमातून वादवान यांच्या बंगल्यात दाखल झाली तेव्हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कोणालाही या कारवाईची कुणकुण लागू देण्यात आली नव्हती. बंगल्यांची संपूर्ण दीड तास झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. सीबीआय पथकाच्या हाताला नक्की काय लागले याविषयी प्रचंड उत्सुकता असून पोलिसांनी या कारवाईबाबत मौन बाळगले आहे.