फलटणच्या कुरेशीनगरमध्ये गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; हद्दपार आरोपीसह तिघांवर गुन्हा दाखल, एक अटकेत

दोन वाहनांसह ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार


स्थैर्य, फलटण, दि. २४ ऑगस्ट : फलटण शहरातील कुरेशीनगर परिसरात सुरू असलेल्या गोवंश कत्तलीच्या प्रकाराचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका हद्दपार आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन वाहनांसह सुमारे ७ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास कुरेशीनगर येथील एका घरात कौटुंबिक कार्यक्रमासाठी गोवंश कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी दोन गोवंशीय जनावरांचे मांस, कातडी, एक स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH-13 AC-2324), एक छोटा हत्ती (क्र. MH-11-DD-5530) आणि इतर साहित्य असा एकूण ७,७७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी बिलाल रफिक कुरेशी याला अटक केली असून, वसीम रफिक कुरेशी आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान, आरोपी वसीम कुरेशी हा पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्यात यशस्वी झाला.

अटक करण्यात आलेला आरोपी बिलाल कुरेशी हा हद्दपारीचा सराईत गुन्हेगार आहे. त्याला सातारा जिल्ह्यासह सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. तरीही त्याने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून फलटण शहरात प्रवेश केला आणि या गुन्ह्यात मदत केली. पोलीस हवालदार संदीप लोंढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!