‘घरोघरी तिरंगा’ अभियानामुळे देशात राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची लाट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाले असून यामुळे राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची मोठी लाट आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनाच्या स्वागतानिमित्त हॉटेल ताज महल पॅलेस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, संदीपान भुमरे, कौन्सुल जनरल राल्फ हेज, विविध देशाचे राजदूत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, विशेष निमंत्रित अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आज संपूर्ण देश हा घरोघरी तिरंगा अभियानामुळे जात, धर्म, भाषा विसरून एक झाला असल्याचे चित्र दिसत आहे. याचाच भाग म्हणून आपण अडीच कोटी घरांवर आपला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवणार आहोत. यामुळे प्रत्येक नागरिक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या अभियानात सहभागी होत आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हा फक्त एक दिवस साजरा करायचा कार्यक्रम नसून देशभक्तीची भावना नागरिकांमध्ये दररोज असली पाहिजे आणि प्रत्येकाला राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा आनंद मिळाला पाहिजे, हा या यामागील उद्देश असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे उद्योग, व्यवसायासह संस्कृती आणि कलेमुळे देशाचे विकासाचे इंजिन बनले आहे. महाराष्ट्र हे सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्यलढ्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यासाठी महाराष्ट्राला देशातील एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रोडमॅपवर आम्ही काम करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आज विविध देशातील मित्र या कार्यक्रमाला उपस्थित असून त्याच्या मार्गदर्शनाने आणि योगदानामुळे आम्ही सर्वसमावेशक विकास साधून विविध क्षेत्रात सहकार्याची देवाणघेवाण करू आणि त्यांच्यासोबतचे संबंध अधिक वृद्धिंगत करू, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिवस साजरा करताना आम्ही 100 वर्षाचा रोड मॅप तयार करीत आहोत. त्याकरिता आम्ही विविध देशांसाठी रेड टेप नाही तर रेड कॉर्पेट टाकत आहोत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!