
स्थैर्य, फलटण, दि. 26 ऑगस्ट : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी फलटण शहर पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे सिस्टीमवर कडक कारवाई करत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे, तर नीरा उजवा कालव्यात पाणी नसल्याने मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी त्या नगरपालिकेकडे दान कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
डीजेवर पोलिसांची करडी नजर
यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि मोठ्या साउंड सिस्टीमवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या कोणत्याही मंडळावर कडक कारवाई केली जाईल, तसेच ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिला आहे. या भूमिकेला ज्येष्ठ नागरिकांनीही पाठिंबा दिला असून, त्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना डीजेच्या दुष्परिणामांबाबत माहिती देऊन जनजागृती केली आहे.
मूर्तीदान करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
यंदा अनंत चतुर्दशी ८ सप्टेंबर रोजी आहे, मात्र नीरा उजवा कालव्याचे पाणी आवर्तन ६ सप्टेंबर रोजीच बंद होणार आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी कालव्यात पाणी उपलब्ध नसणार आहे. या कोरड्या कालव्यात मूर्ती विसर्जित केल्यास त्यांची विटंबना होऊ शकते, ही गंभीर बाब लक्षात घेऊन मंडळांनी आपल्या मोठ्या गणेश मूर्ती नगरपरिषदेकडे दान स्वरूपात सुपूर्त कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे. नगरपरिषदेमार्फत या सर्व मूर्तींचे सुरक्षित आणि योग्य ठिकाणी विसर्जन केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
