
स्थैर्य, फलटण, दि. 17 ऑगस्ट : फलटण शहरातील रेस्ट हाऊससमोर ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे सिस्टीम लावून कर्कश्य आवाजात वाद्य वाजवल्याप्रकरणी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास, आरोपी विशाल शेंडगे याने ‘जयशंकर डिजे साऊंड सिस्टिम’ नावाची साऊंड सिस्टीम ट्रॅक्टर-ट्रॉलीवर लावून, लक्ष्मीनगर येथील रेस्ट हाऊससमोर कर्कश्य आवाजात वाजवली. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला. तसेच, त्याने रस्त्यावर बराच वेळ ट्रॅक्टर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, विशाल शेंडगे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मुंबई पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार माधवी बोडके करत आहेत.

