
स्थैर्य, 23 मार्च, सातारा : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत छ. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी आज मंदिर परिसर आणि यात्रा व्यवस्थेची पाहणी केली. यावर्षीची यात्रा आदर्शवत पार पडली पाहिजे, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन, पुजारी आणि व्यावसायिकांनी समन्वयाने काम करावे, अशा कडक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आणि फिरत्या शौचालयांची सुविधा चोवीस तास उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. वाहतूक आणि शांतताः वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पार्किंगचे नियोजन आणि पोलीस प्रशासनाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या.
यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राजमातांनी खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला आहे. उन्हाळ्यापासून संरक्षणः वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, मंदिर परिसरात भाविकांना अनवाणी चालताना त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण परिसरात हिरव्या रंगाचे मॅट टाकण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यात्रेच्या स्वच्छतेच्या बाबतीत राजमातांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, परिसरात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद राहील.
हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील कचरा उघड्यावर न टाकता त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. कारवाईचा इशाराः दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार आणि व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी मंदिर व्यवस्थापक, पुजारी मंडळी, सेवेकरी आणि स्थानिक व्यावसायिकांची बैठक पार पडली. रशंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त समाधान घेऊन परतला पाहिजे, ही सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन राजमातांनी केले.

