ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे – दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ मे २०२३ । नाशिक । हवामान खात्याने वर्तविलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार नागरिकांना ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज पाणी टंचाई बाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता चव्हाण के., मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जून व जुलै महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरविण्याबाबत शासनस्तरावरून आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांना विश्वासात घेवून गरजेनुसार आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याबाबतचा निर्णय आगामी काळात घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावीत. जेणेकरून संभाव्य पाणी टंचाई काळात त्या पाणी पुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल. तसेच गावपातळीवरील नादुरूस्त विंधन विहिरींच्या दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. पाण्याचा वापर जपून करावा, तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यव होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, गावपातळीवरील पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करून टँकर्सची संख्या निश्चित करण्यात यावी. दुष्काळी गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे जलगतीने पूर्ण करण्यात यावीत. पाणी आरक्षणाबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी दिल्या.

बैठकीनंतर जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाच्या प्रचाररथाला पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!