मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घ्यावी

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन


स्थैर्य, सातारा, दि. 13 डिसेंबर : घटनेने व कायद्याने सगळ्यांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिला असून प्रत्येक व्यक्तीने मानवी हक्कांचे जतन केल्याने समाजातील हिंसाचार कमी होतो. त्यामुळे बंदींनी कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर स्वत:मध्ये सुधारणा करुन मानवी हक्कांची कोठेही पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसानिमित्त जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. निना बेदरकर, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, कारागृह अधीक्षक सतीश कदम, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर आदी उपस्थित होत्या.

बंदींना असलेल्या हक्कांमुळेच आज कारागृहात विविध सुविधा मिळत आहेत, असे सांगून पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, बर्‍याच कारागृहांना भेटी दिल्या असून सातारचे कारागृह अधिक चांगले व स्वच्छ आहे. आर्थिक, सामाजिक व मानवी हक्कांचे जतन केल्यामुळेच गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असल्याचेही पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती बेदरकर म्हणाल्या, बंदींना स्वावलंबी जगता यावे यासाठी कारागृहात विविध स्वयंरोजगारचे प्रशिक्षण देण्यात येते. याचा बंदीनी लाभ घ्यावा. त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व विविध शासकीय विभाग प्रयत्न करीत असतात. ज्या बंदींची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे अशा बंदींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील देण्यात येतो. बंदींना देण्यात येणार्‍या सुविधांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रत्येक महिन्याला पडताळणी करते. कारागृहातून मुक्त होऊन बाहेर पडल्यानंतर बंदीनी मानवी हक्कांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही न्या. श्रीमती बेदरकर यांनी सांगितले.

बंदींना कारागृहातील मुलभूत हक्क कायद्याने व घटनेने दिले आहेत. त्यासाठी विविध शासकीय यंत्रणा काम करीत असतात. येथून बाहेर पडल्यानंतर कोणाच्याही मानवी हक्कांवर गदा येईल असे कृत्य करु नये. बंदींना आवश्यक त्या सुविधा मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासोबत प्रशासनही प्रयत्न करीत असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुचित्रा काटकर यांनी बंदींना असणार्‍या कायदे व देण्यात येणार्‍या सुविधांची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!