ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी; मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : पालकमंत्री छगन भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि. १६: कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावणार नाही तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक येवला विश्रामगृह येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, प्रांताधिकारी अधिकारी सोपान कासार, डॉ.अर्चना पठारे, तहसिलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, तालुका पोलीस अधिकारी अनिल भावारी, येवला पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, कोरोना रुग्ण संख्या शून्यावर येईपर्यंत सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी घरोघरी जावून तपासणी करण्यात यावी. खाजगी डॉक्टर्स, परिचारिकांची मदत घेण्यात यावी. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुयोग्य नियोजन करून त्याचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊन यशस्वी करणे ही पोलिसांची मुख्य जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी, असे सांगून खडक माळेगाव येथे डिसीएचसी रुग्णालय सुरू करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी आरोग्य प्रशासनाला दिले.

व्यापारी लोकप्रतिनिधीशी चर्चा

येवला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात व्यापारी प्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!