
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑक्टोबर : फलटण शहराचे उपनगर असलेल्या कोळकी येथील ‘कार सेंटर’ला गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण वर्कशॉप जळून खाक झाले असून, यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार सचिन पाटील यांनी मध्यरात्री २ वाजता घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पीडित कुटुंबाला धीर देत प्रशासकीय मदतीचे आश्वासन दिले.
वर्कशॉपचे मालक अर्जुन शेंडे हे गुरुवारी रात्री आपले कार सेंटर बंद करून घरी गेले होते. त्यानंतर रात्री उशिरा या वर्कशॉपला आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण वर्कशॉप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.
आगीची माहिती समजताच आमदार सचिन पाटील यांनी तातडीने रात्री २ वाजता कोळकी येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी शेंडे कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना या कठीण प्रसंगात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडित कुटुंबाला तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले.
आगीची माहिती मिळताच फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत धाडसाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले, ज्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
या बचावकार्यात कलप्पा आवाडे यांच्या कारखान्याच्या अग्निशमन दलाची गाडीही तातडीने दाखल झाली. तसेच, गावातील जयकुमार शिंदे, बाळासाहेब काशिद, विकास नाळे, शिवा भुजबळ, स्वागत कशिद, अजित काबळे, अंबादास दळवी, रोहन शिंदे, रणजीत काशिद, बाळासाहेब काळुखे, अभिजित शिंदे यांच्यासह अनेक तरुण आणि ग्रामस्थांनी खाजगी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली.
या घटनेची आणि आमदार सचिन पाटील यांनी दिलेल्या भेटीची सविस्तर माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली. त्यांच्यासह गावातील अनेक तरुण आणि नागरिक रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी मदतीसाठी उपस्थित होते.