दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२३ | फलटण |
खातगुण (ता. खटाव) गावचे सुपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी कै. कॅप्टन श्रीरंगराव लावंड यांनी सैन्यदलात केलेली कामगिरी इतरांना प्रेरणा देणारी असल्याचे मत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद भोसले यांनी व्यक्त केले.
खातगुण (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे इंग्लिश ते मराठी अशा १०० डिक्शनरी मोफत वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भोसले बोलत होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शंकर लावंड, युवा नेते सुबोध जाधव, सोसायटी चेअरमन विजयराव लावंड, सोसायटीचे माजी चेअरमन शामराव भोसले, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव लावंड, धर्मनाथ लावंड, रामदास वाघचौरे, कृष्णराज लावंड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता जाधव, दीपक जाधव, जावेद शेख यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व इयत्ता सातवीतील विद्यार्थी उपस्थित होते.
कै. कॅप्टन श्रीरंगराव लावंड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू कृष्णराज लावंड यांनी पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना इंग्लिश ते मराठी अशा १०० डिक्शनरी मोफत उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेत निश्चित भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसर्या महायुद्धावेळी पूर्व आफ्रिकेतील केरेन डोलोगोरोडॉक किल्ला लढाईची जबाबदारी सुभेदार श्रीरंग लावंड यांच्यावर सोपविली होती. त्यांनी सोबत असलेल्या मराठा वीरांसोबत केरेन किल्ला ताब्यात घेतला. सुभेदार लावंड यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही रणगर्जना करीत लढाई जिंकली. तीच घोषणा मराठा रेजिमेंटमध्ये आजही अखंडित दिली जात असल्याचे शिक्षणतज्ज्ञ व शाळा व्यवस्थापन सदस्य शंकर लांवंड यांनी सांगितले.
सेवानिवृत्ती घेतल्यावर कै. कॅप्टन श्रीरंगराव लावंड़ यांनी सन १९५४ साली खातगुण शाळेसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली. कॅप्टन लावंड व माझे आजोबा यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांचे कार्य आजच्या पिढीला अवगत व्हावे, या उद्देशाने मदत म्हणून १०० डिक्शनरी उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना जी मदत लागेल ती करण्यासाठी आपण सहकार्य करू. मुलांनी त्यांची प्रेरणा घेऊन भरतीय सैन्यदलात जाऊन देशसेवा करावी, अशी अपेक्षा कृष्णराज लावंड यांनी व्यक्त केली.
कै. कॅप्टन श्रीरंगराव लावंड यांची प्रतिमा कृष्णराज लावंड यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता जाधव यांच्याकडे सुपूर्द केली. स्वागत व प्रास्ताविक दीपक जाधव यांनी केले.
जावेद शेख यांनी आभार मानले.