दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । फलटण। राजाळे वीज वितरण केंद्रातून राजाळे व परिसरातील गावांमध्ये शेती पंपासाठी होणारा वीजपुरवठा अतिरिक्त वीजवापरामुळे वारंवार खंडीत होत असल्याने वीजेअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राजाळे वीज केंद्राची क्षमता वाढवावी, अशी मागणी शंभू सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष निखिल निंबाळकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राजाळे वीज वितरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये बागायती क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या भागात शेती पंपाच्या वीजेचा वापर एकाच वेळी शेतकरी करतात. त्यामुळे वीज मागणी व प्रत्यक्ष होणारा वापर यामध्ये फरक पडत असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, दिवसाआड वीज पुरवठा बंद करणे यामध्ये शेतकरी वर्ग व अधिकारी वर्गामध्ये खटके उडत आहेत. शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. यामध्ये कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी २२केव्ही जानाई फिडर राजाळे या विद्युत वाहिनी ची क्षमता वाढवून आम्हाला अखंडपणे वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ही निंबाळकर यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता वग्यानी, उपमुख्यकार्यकारी अभियंता खिलारे, कनिष्ठ अभियंता सोनवणे यांना देण्यात आल्या आहेत.