दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
कुंभारभट्टी, मलटण, ता. फलटण येथे काल सायंकाळी ४.३५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे २ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा गांजासदृश पदार्थ मिळून आला आहे. हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी दोघाजणांवर अंमल पदार्थ बेकायदा बाळगल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज बाळू मोरे (वय ३८), व रामा राजेश जाधव (वय ३०, दोन्ही रा. कुंभारभट्टी, मलटण, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुंभारभट्टी, मलटण, ता. फलटण येथे काल सायंकाळी ४.३५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात वरील आरोपींकडे त्यांच्या राहत्या घराच्या आतील रूममध्ये एका पोत्यात १२,१७० कि. ग्रॅम तसेच ६० ग्रॅम वजनाचा ९ पुड्यांमध्ये हिरव्या काळया रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजासदृश पदार्थ मिळून आला. तसेच पोत्यातील मिळाल्याचे मालाचे वजन करून त्यातील हिरव्या काळया रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजा सदृश पदार्थ दिसून आल्याने त्यांचे वजन केले असता ते एकूण १२,२३० कि. ग्रॅम भरले. या सर्व मालाची किंमत २,४४,६००/- रूपये आहे. हा माल वरील आरोपींनी बेकायदा गांजा विक्री करण्याकरीता बाळगल्याप्रकरणी वरील आरोपींवर अंमल पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.