पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक; नीरा उजवा कालव्याच्या पाण्यावरून होणार वाद?


दैनिक स्थैर्य | दि. 01 मार्च 2025 | फलटण | पुण्यात आज दुपारी ४:०० वाजता कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत उन्हाळा हंगाम २०२४-२५ साठीच्या सिंचनाच्या पाण्याच्या नियोजनावर चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. यात खडकवासला, पवना, चासकमान, भामा आसखेड, नीरा डावा कालवा, नीरा उजवा कालवा या पाच प्रकल्पांमधील पाण्याच्या नियोजनावर चर्चा होणार आहे.

नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आर्वतनात वाढीव पाण्याची मागणी माळशिरस व सांगोला तालुक्यातून करण्यात आली आहे. मात्र, पाणी वाटपासंदर्भात प्रथेप्रमाणे पाणी वाटप व्हावे आणि नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने पाणी मिळावे, यावर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ठोस भूमिका राहणार आहे. त्यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातील शेतकरी वर्गही पुण्यात धडकणार आहे.

नवीन पाणी वाटपाचे धोरण ठरवून फलटण – खंडाळा तालुक्याच्या हक्काचे पाणी इतर तालुक्यात देवू नये, याबाबत ठोस भूमिका घेतली जाणार आहे. पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा झाल्यानंतर संभाव्य शिल्लक पाण्यावरही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा अधिकार आहे, यावरही चर्चा होणार आहे.

पाणी वाटपाबरोबरच संबंधित विभागाकडून आकारण्यात आलेल्या वाढीव पाणी पट्टीच्याबाबतही तालुक्यातील शेतकरी आवाज उठवणार आहेत. पाणी वाटपातील संभाव्य बदल झाल्यास फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येईल, परिणामी तालुक्यातील साखर कारखानदारीलाही फटका बसेल.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याच्या नियोजनावर होणारी चर्चा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या बैठकीचा परिणाम पुढील उन्हाळ्यातील सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धतेवर पडणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लक्ष दिले जाणे आणि त्यांच्या हक्काचे पाणी सुरक्षित राखणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे.


Back to top button
Don`t copy text!