
दैनिक स्थैर्य । 3 एप्रिल 2025। सातारा । सातार्यातून मुंबईला जाणार्यांवर आता 53 ठिकाणी स्पीड लिमिट कॅमेर्यांची करडी नजर राहणार आहे. हे कॅमेरे वाहनांच्या वेगाचे मोजमाप करणार असून, अतिवेगात धावणार्या वाहनांना आता जबर दंड सोसावा लागणार आहे.
सातारा ते मुंबई एक्स्प्रेस हायवेने प्रवास करणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक मुंबईकडे जाताना जुन्या हायवेने न जाता एक्स्प्रेस हायवेचा वापर करत असतात. सातारा ते मुंबई दरम्यान हायवे व एक्स्प्रेस वेने प्रवास करताना
ओव्हरस्पीडिंग, महामार्गावर वाहन उभा करणे, बोगद्यात वाहने उभी करणे, महामार्गावर दुचाकी चालवणे, लेनचे नियम तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, टेललाईट रिप्लेक्टर नसलेले वाहन, अनधिकृत नंबर प्लेटचा वापर, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, आदी नियंत्रण कॅमेर्याच्या कक्षेत येणार आहे. सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी वाहतूक वेग मयदिचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, एक्स्प्रेस वेवर वाहन गेल्यावर वाहनांची जणू एकमेकांशी स्पर्धा लागते.
180 प्रतिकिलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त स्पीडने वाहने चालवली जातात. परिणामी अनेकदा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतो. तर बर्याच वेळा अतिवेगात असताना वाहनाचे टायर फुटून दुर्घटना घडते. अतिवेगाबरोबरच लेन कटिंगचीदेखील समस्या आहे. लेन कटिंगमुळेदेखील अपघात घडतात. अशा अपघातामध्ये नियमांचे पालन करणार्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन महामार्ग पोलिस, आरटीओ यांनी एक्स्प्रेस वेवर स्पीड गन बसवले आहेत. हे कॅमेरे अतिवेगात जाणार्या आणि लेनची शिस्त न पाळणार्या वाहनांवर वॉच ठेवत आहेत. वाहने वेगाने चालवली जात असल्याने या कॅमेर्यांद्वारे मोठ्या प्रमाणात ई-चलन स्वरूपात वाहनचालकांना दंड बसत आहेत. यामध्ये ओव्हर स्पीड व लेन कटिंगचे दंड जास्त प्रमाणात वाहनधारकांना बसत आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम जमा होत आहे.
सातारा ते मुंबई दरम्यान, कात्रज बोगदा उतार, नन्हे ब्रीजपासून 1 किमी अलिकडे, नवले ब्रीजच्या मागील ब्रीजवर 1 किमी., वारजे ब्रिजच्या अलिकडे 500 मीटर, एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर 500 मीटर, शिरगाव गावापासून पुढे 3 किमीवर, उरसे गुरू वामन ब्रीजपासून पुढे किमी, बाऊर ब्रीजच्या अलिकडे 100 मीटर, बाऊर ब्रीज नं 2 च्या 500 मीटर पुढे, बोरज ब्रीजच्या पाठीमागे 100 मीटर, मळवली ब्रीजच्या पुढे 500 मीटर, सिंहगड कॉलेजच्या पुढे 500 मीटर (कार्ला) लोणावळा जुना हायवे ब्रीज टोलनाक्याच्या वरती, लोणावळा जुना हायवे ब्रीज संपताना, कुणेगाव ब्रीज जवळ, खंडाळा जुना बोगद्याजवळ 500 मीटर अलिकडे, जुना एस कॉर्नर ब्रीज जवळ अलिकडे, मारुती मंदिर जवळ घाटामध्ये, आडोशी बोगद्याच्या अलिकडे 500 मीटर यासह अन्य ठिकाणी जाताना 29 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर मुंबई ते पुणे दरम्यान 27 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय आरटीओची स्पीडगन इंटर सेप्टर वाहने महामार्गावर ठिकठिकाणी उभी करण्यात येत आहेत. ही वाहनेही अतिवेगाने चालणार्या वाहनांचे वेगमाप मोजून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत.
अशी आहे वेगमर्यादा
मुंबई-पुणे महामार्गावर घाट परिसरामध्ये हलक्या मोटार वाहनाची (कार) वेग मर्यादा 60 कि. मी. प्रतितास आहे. उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 40 कि.मी. प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) वेग मर्यादा 100 कि. मी. प्रतितास असून, उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 80 कि. मी. प्रतितास आहे.