दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । फलटण । उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. या घटनेत बारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना भररस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले असून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने तर एका शेतकऱ्याला गोळ्या घालून मारल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्याचा देशभर निषेध होत आहे. यासाठी सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी फलटण तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद करण्याची हाक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व शिवसेना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पुकारण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.
तरी महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षातील कार्यकर्तांनी सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता फलटण येथील नाना पाटील चौक येथे सर्वांनी यावे, असे आवाहन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी – बेडके व शिवसेना तालुकाप्रमुख विकास नाळे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.