दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सातारा जिल्हयामध्ये महाराष्ट्र शासनाची अधिसुचना दिनांक 14 मार्च 2017 अन्वये, सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी (SPCA), सातारा या विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली असुन या संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीमधील अशासकीय सदस्यांचा तीन वर्षे कार्यकाल संपला असल्याने पुढील तीन वर्षासाठी नव्याने अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची आहे.
यामध्ये जिल्हयामधील गोशाळा / पांजरापोळ संस्थेपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणा-या सेवाभावी संस्थांचे 2 सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशन केलेल्या 2 व्यक्ती, जिल्हयामधील मानवहितकारक कार्य करणारे / प्राण्यांवर काम करणारे / प्राणी कल्याणासाठी काम करणारे 5 ते 6 कार्यकर्ते. यांची नियुक्ती करावयाची आहे. तरी जिल्हयांमधील इच्छुक पात्र व्यक्ती यांनी अर्ज व कागदपत्रांसह प्रस्ताव दिनांक 15 मार्च 2023 अखेर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कार्यालय, गोडोली- सातारा येथे सादर करावेत.
जिल्हयातून प्राप्त झालेल्या अर्जाबाबत प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी (SPCA), सातारा यांचेमार्फत शासनास शिफारस करण्यात येवून शासनाकडुन नियुक्ती झालेल्या दिनांकापासुन सदर अशासकीय सदस्याचा कार्यकाळ तीन वर्षे राहणार आहे. तरी जिल्हयामधुन जास्तीत जास्त अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. अं. तु. परिहार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सातारा यांनी केले असुन अर्जांचे नमुनेबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कार्यालय, गोडोली- सातारा येथे संपर्क साधावा.