दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठया प्रमाणावर भासत होती. त्याकाळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले. भविष्यामध्ये कोरोना महामारीचे संकट आल्यास व रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास सामाजिक बांधिलकी म्हणून अजिंक्यतारा कारखान्याकडून आता ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
कोरोना महामारीत ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत होती. अनेक ठिकाणी असंख्य रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावल्याच्या घटना घडल्या. अशा गंभीर परिस्थितीत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती करून रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. कोरोना महामारीत सामाजिक बांधिलकी म्हणून कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला मूर्त स्वरूप मिळाले असून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास श्रीमंत छ. वेदांतिकाराजे भोसले, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रीमती वनिता गोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. छाया कुंभार, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची क्षमता २५ घनमीटर प्रति तास एवढी आहे. या प्रकल्पातून दररोज तासाला ३ सिलेंडर याप्रमाणे २४ तासामध्ये ७० ते ८० सिलेंडर्स भरले जातील. एका सिलेंडरमध्ये साडेनऊ किलो ऑक्सिजन राहील. प्रकल्पातून निघणाऱ्या ऑक्सिजनचा वापर हा मेडीकल व इंडस्ट्रीयल वापरासाठी होणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना आणि विविध कंपन्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, बिगर सभासद, अजिंक्य उद्योग समुहाचे पदाधिकारी, अधिकारी- कर्मचारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.