फलटणमध्ये बंद बंगला फोडून साडेबारा लाखांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरातील मुधोजी कॉलेज रोड, शुक्रवार पेठ येथील आडत व्यावसायिक दिलीप प्रभाकर फणसे यांच्या ‘अनघा’ या बंद बंगल्याचे कुलूप तोडून सुमारे २७ तोळे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदीच्या वस्तू-दागिने व चाळीस हजार रुपये रोख असा एकूण साडेबारा लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवार, दि. २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रातोरात ठसे तज्ज्ञांना व श्वान पथकास प्राचारण केले; परंतु श्वान बंगल्याच्या परिसरातच घुटमळत राहिले. या चोरी प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फलटण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप फणसे हे कुटुंबीयांसमवेत दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात संशयित चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील तिजोरी, कपाटे फोडून सामान विस्कटून देऊन कपाटामध्ये ठेवलेले २७ तोळे सोन्याचे दागिने, तीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू-दागिने व रोख रक्कम ४० हजार रूपये तसेच इतर वस्तू असा एकूण १२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान फणसे कुटुंबीय घरी पोहोचले असता गेट उघडून दरवाजा जवळ आले तेव्हा दरवाजाचा कोयंडा तोडल्याचे त्यांना पाहायला मिळाले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता विस्कटलेले सामान पाहून चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.


Back to top button
Don`t copy text!