स्थैर्य, रहिमतपूर, दि. 7 : धामणेर (रेल्वे स्टेशन) येथील शंकर किराणा स्टोअर्सला रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीत अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सुदैवाने वेळीच जाणीव झाल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, धामणेर (रेल्वे स्टेशन) येथे कृष्णाजी हणमंत निंबाळकर यांचे शंकर किराणा स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी दिवाळीचा संपूर्ण माल व इतर साहित्य दुकानात भरले होते. दुकानाला लागूनच मालाचे गोडवून सुद्धा आहे. रात्री 12.15 च्या सुमारास दुकानात शॉर्टसर्किट झाले व दुकानातून धूर येवू लागला. या दरम्यान दुकानासमोरील दवाखान्यातील डॉ. प्रवीण केंजळे हे जागे झाले. त्यांना धूर दिसल्यावर हा प्रकार वेगळा वाटला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दुकानातून धूर येत होता व आत आग लागली होती. त्यांनी तत्काळ सर्वांना उठवले. परंतु दुकानात तेलाचे डबे असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. गावातील तरुण मुलांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तत्काळ रहिमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी बोलविण्यात आली. पण तरीही आग आटोक्यात येत नव्हती. या आगीमध्ये संपूर्ण किराणा साहित्य, घरामधील 10 तोळे सोने, फर्निचर, घरगुती साहित्य व पत्रा जळून खाक झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घराची भिंत कोसळली आहे. काही क्षणातच सर्व काही संपून गेले होते. त्यामुळे दुकान मालकाना अश्रू अनावर झाले. महसूल अधिकारी दिवसभर पंचनामा करण्याचे काम करत होते. गावातील विविध मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. दुकान बेचिराख झाले.
या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास हवालदार कांबळे हे करत आहेत.