गुरुवार पेठेत घरफोडी २७ तोळे दागिन्यांची चोरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा शहरातील गुरुवार पेठ येथे जेधेवाड्यामध्ये अज्ञात चोरट्याने शिवाजीराव दत्तात्रय जेधे यांच्या घराचे कुलूप तोडून तब्बल 27 तोळे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हातोहात लांबवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या घटनेने पोलिसांपुढे जलद तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे . सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा शहर,शाहूपुरी, बोरगाव ,सातारा तालुका या पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची चार पथके तैनात करून तपासासाठी रवाना केली आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून यासंदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्याचे महत्त्वपूर्ण माहिती आहे याबाबतची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कमानी हौदा लगत असणाऱ्या जेधे वाड्यामध्ये शिवाजीराव दत्तात्रय जेधे (राहणार 508 गुरुवार पेठ ) हे काही कामानिमित्त त्यांच्या पत्नीसह पुण्याला तर त्यांची कन्या मुंबईला गेली होती . घर कुलूप बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख असा ऐवज हातोहात लांबवला जेधे यांची कन्या आणि पत्नी यांच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे या दागिन्यांमध्ये पाच तोळ्याचे बांगड्या, चार तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची चेन, 6gm ची वेढणी, एक ग्रॅमची अंगठी, दीड तोळ्याचे कानातले ,दीड तोळ्याचा बदाम, एक तोळ्याची नथ, एक तोळ्याचा नेकलेस, पाच तोळ्याच्या बांगड्या, तीन तोळ्याचे मंगळसूत्र ,एक तोळ्याची चेन, 1 ग्रॅम चे वेढणे, दोन ग्रॅमची अंगठी, एक मोहन माळ, एक ग्रॅमची नथ, अडीच ग्रॅम चे कानातले डूल, चांदीची भांडी आणि रोख पाच हजार रुपये असा मुद्देमाल लांबवला.

घर बंद असल्याचे बघून चोरट्यांनी साधारण साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल हातोहात लंपास केल्याची माहिती आहे जेधे कुटुंबीय सकाळी मुंबईवरून माघारी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला ठसेतज्ञांना सुद्धा यावेळी पाचारण करण्यात आले होते एकूण चोरीच्या पद्धतीवरून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे काही महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे चार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी चार पथकामध्ये विभागून त्यांना तपासासाठी रवाना करण्यात आले आहे साताऱ्यात मोठी घरफोडी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून घटनेमुळे पोलीस यंत्रणेलाच आव्हान निर्माण झाले आहे नागरिकांनी बाहेरगावी जाताना खबरदारी घ्यावी आणि मौल्यवान वस्तू शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!