महाबळेश्वरात वाढले घरफोड्यांचे प्रमाण

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; नागरिकांत भीतीचे वातावरण


स्थैर्य, सातारा, दि. 12 ऑगस्ट : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या चोरट्यांनी पोलिसांनाच जणू खुलं आव्हानच दिले असून, मध्यरात्री घडणार्‍या घरफोड्या आता दिवसाही घडू लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. दुचाकी, हॉटेलमधील वस्तूंच्या चोरींपाठोपाठ आता भरदिवसा घरफोड्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत श्री हनुमान मंदिरानजीक सध्या अंतर्गत काम सुरू असल्याने बंदस्थितीत असलेल्या एका हॉटेलमध्ये नुकतीच चोरी झाली होती. ही घटना ताजी असताना आता नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील सार्वजनिक बोळामध्ये असलेल्या संजय दस्तुरे यांच्या बंद घराचे कुलूप फोडून घरामध्ये असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या चांदी, तांब्यासह पितळेची जुनी भांडी चोरट्यांनी लंपास केली.

दरम्यान, दस्तुरे यांच्याकडे कामास असलेली मोलकरीण या रस्त्यावरून कामाला जाताना घर उघडे दिसल्याने संशय आला. मोलकरणीने घरात कोण आहे? असा बाहेरून आवाज दिला. आतमधून चार ते पाच चोरट्या महिला व एक पुरुष बाहेर आले व आम्ही श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलोअसल्याचे सांगितले. मात्र, दस्तुरे कुटुंबीय पुणे येथे गेल्याचे मोलकरणीस माहीत होते. या अनोळखी लोकांचा तिला संशय आल्याने तिने विचारणा केली असता मोलकरणीस या चोरट्यांनी धक्काबुक्की केली. मोलकरणीने गोंधळ घालताच चोरलेल्या वस्तू घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले. चोरीचा प्रकार मोलकरणीने फोनवरून दस्तुरे यांना सांगितला.पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रूपाली काळे यांच्यासह सहकार्‍यांनी पंचनामा केला, तसेच सातारा येथून श्वान पथक व हस्तरेखा पोलिसांच्या पथकाने घराची पाहणी केली. याबाबतचा तपास सुरू आहे.

महाबळेश्वर पर्यटनथळी मुख्य चौकाचौकांमध्ये पालिकेच्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. मात्र, अजूनही मरी पेठ, मस्जिद रस्ता यांसह ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे चोरट्यांना वचक बसेल आणि झालीच चोरी तर चोरट्यांचा शोध घेण्यात मदत होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!