फलटण शहरामध्ये घरफोडी करणारा व डी.पी. चोरीमध्ये १२ गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कामगिरी करत फलटण शहरामध्ये घरफोडी करणारा व डी.पी. चोरीमध्ये १२ गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे ६२ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्यात दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे यांना तपासाच्या सूचना देऊन विशेष पथकाची नियुक्ती केली होती.

हे पथक तपासासाठी पेट्रोलिंग करत असताना दोन इसम विनानंबरच्या मोटारसायकलवरून फलटणच्या महात्मा फुले चौकात एका प्लास्टिकच्या पोत्यात काहीतरी घेऊन जाताना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; परंतु त्यांनी मोटारसायकल सुसाट सोडली. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले व चौकशी केली असता, गाडीवरील इसमांनी त्यांचे नाव सागर शिवाजी काळे (वय २८, रा. वडगाव, ता. फलटण) व शक्तीमान उर्फ दयानंद अशोक भोसले (वय २१, रा. साठेफाटा, ता. फलटण) असे सांगितले. त्यांच्याकडे पोत्यात काय आहे, असे विचारले असता त्यांनी ही भांडी कोळकी, ता. फलटण येथून राहत्या बंद घरातून चोरी केल्याचे सांगितले.

सदरील आरोपींकडे अधिक चौकशी करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला व त्यास अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी २१०० रूपये किमतीचा मुद्देमाल व ६० हजार रूपये किमतीची मोटारसायकल असे एकूण ६२,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे सखोल तपास केला असता सदर गुन्ह्यातील आरोपी शक्तीमान उर्फ दयानंद अशोक भोसले (वय २१, रा. साठेफाटा, ता. फलटण) हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडील एकूण १२ गुन्ह्यांमध्ये फरारी असल्याचे गुन्हे अभिलेखावरून निष्पन्न झाले आहे.

वरील आरोपीस सध्या पोलीस अभिरक्षा मंजूर असून गुन्ह्याचा तपास पो.ह. धापते करत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, स.फौं. भोसले, पो.ह. होले, पो.ह. धायगुडे, धापते, वाडकर, काळुखे, जगताप, नाळे आदींनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!