स्थैर्य, सातारा, दि.10: आसले, ता. वाई येथील ओंकार चव्हाण यांचा निर्घृण खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याप्रकरणातील सुत्रधार गुंड अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव घटनेपासून पोलिसंना गुंगारा देत होता. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातील भटिंडा शहरातील एका हॉटेलमध्ये बंटी जाधव व त्याचा साथीदार नखील शिवाजी मोरे वय 24 वर्षे रा. फुलेनगर भुईंज ता. वाई यांच्या मुसक्या आवळल्या. भटिंडामधील याच हॉटेलमध्ये उंब्रज परिसरातील एक सराईत आरोपी मयूर महादेव साळुंखे वय 35 वर्षे रा. कालगाव, ता. कराड हा देखील एलसीबीच्या हाती लागला.
याबाबत माहिती अशी, 4 जानेवारी रोजी ओंकार कैलास चव्हाण वय 30 वर्षे, ना. आसले, कृष्णा पूलाजवळ, ता. वाई मूळ रा. करंदी, ता. जावली, जि. सातारा हे दुपारी 04.30 च्या सुमारास पाचवड येथील नेट कॅफेमध्ये जावून येतो असे सांगून निघून गेले ते पुन्हा घरी आलेच नाहीत. त्याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात येथे मिसिंगची नोंद दाखल होती. याचा तपास करत असताना ओंकार कैलास चव्हाण याचे गावातील काही मुलांनी अपहरण करून त्याचा खून केला आहे, अशी माहिती प्राप्त झाली होती. त्यामधील 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून ओंकार चव्हाण याचे गुन्हा गुन्हा उघड केला होता. अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा हा संघटीतरित्या केल्याने त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती.
तपासात एकुण 18 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 13 आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. परंतु, मुख्य आरोपी टोळीप्रमुख अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने वास्तव्याची ठिकाणे बदलून पोलीसांना गुंगारा देत होता. त्याचा शोध घेवून त्यास अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक दोन महिन्यांपासून या गुन्हयाचा समांतर तपास करत होते. तांत्रिक तपासाचे आधारे अनिकेत ऊर्फ बंटी जाधव व त्याच्या साथीदारांच्या वास्तव्याबाबत माहिती प्राप्त केली.
अनिकेत ऊर्फ बंटी जाधव हा साथीदार निखील शिवाजी मोरे याच्यासह राजस्थान येथे असल्याबाबत माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. हे पथक राजस्थान येथे संबंधित ठिकाणावर जाण्यापूर्वीच आरोपीने ठिकाण बदलले. तपास पथकाने राजस्थान, हरीयाना, पंजाब आदी राज्यात आरोपी बदलत असलेल्या ठिकाणी जावून शोध घेतला. अखेर अनिकेत उर्फ बंटी जाधव व साथीदारासह पंजाब राज्यातील भटिंडा येथे असल्यची माहिती प्राप्त झाली. तपास पथकाने भटिंडा येथे आरोपीकडे असलेल्या संशयीत वाहनाचा शोध घेतला असता स्थानिक गुन्हे शाखोच्या पथकाला आरोपींकडे असलेले संशयीत वाहन एका हॉटेलसमोर लावलेले दिसले. यावेळी संबंधित आरोपींसोबत सराईत गुन्हेगार व उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी मयूर महादेव साळुंखे रा. कालगाव हा देखील या हॉटेलवर थांबल्याचे आढळून आले. तीनही आरोपींना पथकाने 7 रोजी दुपारी हॉटेलमधून ताब्यात घेतले. दि. 9 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तीनही आरोपींना घेवून सातार्यात दाखल झाले. खूनाच्या एक गुन्हा, प्राणघातक हल्ला, आर्म अॅक्टयासह 15 गुन्हे दाखल असलेला अनिकेत ऊर्फ बंटी जाधव 14 मे 2020 पासून फरार होता. त्यादरम्यानच त्याने भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा गंभीर गुन्हा केला आहे. मयुर महादेव साळुंखे हा 11 मार्च 2020 पासून फरार होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, हवा.अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, पो. कॉ. रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, वैभव सावंत, अनिकेत जाधव, प्रविण आहिरे, महेश पवार यांनी केली आहे.
पोलिस अधीक्षकांकडून एलसबीच्या पथकाचे कौतूक
सलग 2 महिने अथक परिश्रम घेवून तसेच सलग 5 दिवस राजस्थान, हरियाना, पंजाब राज्यात जावून अहोरात्र तपास करून पंजाब राज्यातील भटींडा येथून टोळीप्रमुख अनिकेत ऊर्फ बंटी जाधवसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे. पुण्यातील एक कुख्यात गुंड गजा मारणे आणि सातार्यातील मोक्का लागलेल्या टोळीचा सुत्रधार बंटी जाधव अशा दोघांना जेरबंद केल्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी पोलिस दलाचे विशेष अभिनंदन केले.
परराज्यात वास्तव्यादरम्यान गुन्हेगारांना अर्थसाह्य करणारे पोलिसांच्या रडावर
गुन्हा घडल्याासून 2 महिने राजस्थान, हरियाना, पंजाब अशा राज्यात सराईत गुन्हेगार ठावठिकाणा बदलत त्यांच्या मागावर असलेल्या पोलिस पथकाला गुंगारा देत होते. या काळात परराज्यात त्यांच्या राहण्याकरिता आलेला खर्चाची माहिती क्रेडिट कार्डवरून पोलिस घेणार आहेत. तसेच त्यांना कोण मदत करत होते का याचाही पोलिस तपास करत असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले.