दागिने चोरणाऱ्या बंटी बबली ला लोणंद पोलिसांकडून अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, लोणंद , दि.०६: लोणंद येथील एका घरात भाडेकरू बनून रहात असलेल्या पती पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला मात्र लोणंद पोलिसांनी या बंटी बबली ला अटक करत आपला पोलिसी हिसका दाखवला आहे.

लोणंद येथील अशोक अनंत महामूनी यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून भाडेकरू म्हणून रहात असलेल्या नवनीत मधुकर नाईक व त्याची पत्नी प्रिया नवनीत नाईक रा भांडूप ,मुंबई यांनी घरमालक घरात नसल्याचे पाहून घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला होता. याप्रकरणी घरमालक अशोक महामूनी यांनी लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. लोणंद पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक व पोलीस स्टाफ यांनी मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी पति-पत्नी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. लोणंद पोलीसांनी सदर दुकलीकडुन चोरी केलेले
चार तोळे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

आरोपी नाईक पति – पत्नी हे बंटी बबली या नावनेही परिचित असुन त्यांचेवर यापुर्वी सांगली, कोल्हापुर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, जालना, नगर, वाशिम, नागपुर या जिल्हयात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत अशी आहे की हे पेईंग गेस्ट म्हणुन ज्या ठिकाणी रहात असत तेथील शेजाऱ्यांशी मैत्री वाढवुन शेजारी किंवा घरमालक बाहेरगावी गेल्यावर संधी साधुन सदर आरोपी घरफोडी ,चोरी करून पळ काढत होते.

या प्रकरणी पोलीस अधिक्षक सातारा अजयकुमार बन्सल व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उप-निरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ना. संतोष नाळे, श्रीनाथ कदम तसेच स.फौ. शिकिलगार, पो.हवा.गार्डे, महेन्द्र सपकाळ, बी.के. पवार, पो.कॉ. शशिकांत गार्डी, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, केतन लाळगे, विठ्ठल काळे महिला पोलीस प्रिया दुरगुडे यांनी कारवाईत सहभाग घेतला असुन गुन्हयाचा तपास पो.हवा.गार्डे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!