
दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । सातारा । दारूचे पैसे मागीतल्याचा राग येऊन कोरेगाव तालुक्यातील दोघांनी निसराळे फाटा (ता.सातारा) येथील बारसमोर उभी केलेली बुलेट मोटरसायकल पेटवून देण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेची फिर्याद ओंकार भरत मोहिते (वय २९, मूळ रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, हल्ली रा.निसराळे फाटा, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अक्षय मारुती राक्षे( रा. वाठार-किरोली, ता. कोरेगाव) व रोहन नारायण घोलप (रा.रहिमतपूर,ता.कोरेगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार मोहिते यांनी निसराळे फाटा येथील मोहन बार ब रेस्टॉरंट चालविण्यासाठी घेतले आहे. त्यांचे रहिमतपूर येथे कोणार्क हॉटेल व बार तसेच वाठार-किरोली येथे मोहिते ढाबा व परमिट रूम बिअर बार असून ते त्यांचे वडील व लहान भाऊ चालवत असतात.
शुक्रवारी अक्षय राक्षे व रोहन घोलप हे रहिमतपूर येथील कोणार्क बारमध्ये दारू प्यायले. त्यानंतर दारूचे झालेले १,१४५ रुपयांचे बिल न देताच निघून जात असताना ओंकार मोहिते यांच्या वडिलांनी बिल मागितले. यावेळी या दोघांनी त्यांच्याशी वाद घातला व निघून गेले. याची माहिती वडिलांनी निसराळे फाटा येथे असलेल्या ओंकारला दिल्यानंतर त्याने यांच्याकडे बिलाची विचारणा केली.
या वेळी अक्षय राक्षे याने ‘मी बिल देणार नाही. तुला काय करायचे ते कर. तुमचे तीनही बार पेटवून देणार. तुमचे साम्राज्य संपवनार’ अशी धमकी दिली. रात्री ओंकार मोहिते हे निसराळे फाटा येथील हॉटेल बंद करून तेथेच झोपी गेले. यावेळी त्यांनी बुलेट हॉटेलसमोरील पैसेजमध्ये सुरक्षित उभी केली होती.
शनिवारी पहाटे १.३० च्या सुमारास रबर जळत असल्याचा वास आल्याने गच्चीवर झोपलेले कामगार उठले असता त्यांना खाली उभी असलेली बुलेट जळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती ओंकार मोहिते यांना दिली. यावेळी त्यांना महामार्गावरील पुलाजवळ अक्षय राक्षे व रोहन घोलप उभे असल्याचे दिसले. त्यांना ओंकारने आवाज देताच ते तेथून पळून गेले. या आगीत बुलेट संपूर्णपणे जळून गेल्याने अंदाजे १.३९ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा पुढील तपास हवालदार पी.पी.शिंदे करत आहेत.