बांधकाम व्यावसायिकांनी कुठल्याही अमिशाला बळी न पडता प्रामाणिकपणे व्यवसाय वाढवावा: वि.ल.वाघमोडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.15 : शहराची वाढ सुनियोजीत करणे हे बांधकाम व्यावसायीकांचे प्रथम कर्तव्य आहे. नवीन नियमानुसार शहरांची उभी वाढ होणार असून व्यवसायीकांनी कुठल्याही अमिशाला बळी न पडता, प्रामाणिकपणे आपला व्यवसाय वाढवावा, असे आवाहन नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक वि.ल.वाघमोडे यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम विकासासाठी एकच नियमावली लागू करण्यात आली असून, या संबंधीची एकदिवसीय कार्यशाळा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरने आयोजित केली होती. त्यामध्ये मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरुन वाघमोडे बोलत होते. यावेळी फलटण प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, बिल्डर्स असोसिएशनचे राज्य चेअरमन सुधीर घार्गे उपस्थित होते.

यावेळी वि.ल.वाघमोडे यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना नव्या नियमावलीचे विश्लेषण करुन सर्वांच्या शंकांचे निरसन केले.

प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप म्हणाले, कोरोना काळात बिल्डर्स असोसिएशनने खूप चांगली सामाजिक जबाबदारी पार पाडली असून, फलटण शहराच्या सुनियोजित बांधकाम विकासामध्ये बिल्डर्स असोसिएशनच्या सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. भविष्याचा विचार करुन बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या प्रकल्पामध्ये नियमापेक्षा जास्त पार्किेंग ठेवावे, रेनवॉटर हार्वेस्टींग, सौर ऊर्जा याबाबी काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहनही डॉ.जगताप यांनी केले.

या कार्यशाळेसाठी प्रमोद निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर, सचिन निंबाळकर, महेश साळुंखे, प्रमोद जगताप, दिलीप शिंदे, राजीव नाईक निंबाळकर, महेश गरवालीया राहुल नलवडे, क्रेडाईचे चेअरमन विजय जाधव, बारामती सेंटर चेअरमन दिपक काटे, साताराचे विजय निंबाळकर, शफिक मोदी व 70 पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!