दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा शहर परिसरात असणाऱ्या डोंगरातील जंगलांमधून भक्ष व तहानेने व्याकुळ झालेले वन्य प्राणी सातारा शहरात येत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्या अगोदरच डोंगरांमधील जंगलामध्ये नैसर्गिक पाणवठे तयार करावेत, उन्हाळ्याच्या दिवसात याच डोंगरांमध्ये वणवे लावणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती सौ. सीता राम हादगे यांनी आज सातारा तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. दरम्यान, निवेदनात करण्यात आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्यावर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही निवृत्ती चव्हाण यांनी यावेळी दिली.
निवेदनात म्हटले आहे, सातारा शहर परिसराला मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. यवतेश्वर, महादरे, अजिंक्यतारा किल्ला, जानाई – मळाई, गोळीबार मैदान लगत असणारे डोंगर सह्याद्रीच्या रांगा म्हणून ओळखल्या जातात. यातील बहुतांश ठिकाणी घनदाट जंगल आहे. सहाजिकच या जंगलात बिबटे, हरीण, भेकर, ससे, रानगवे, जंगली डुक्कर यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये जंगलापर्यंत सिमेंट काँक्रीटची घरे पोहोचल्यामुळे वन्यप्राणी सातत्याने आपला अधिवास बदलत असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. काही वर्षापूर्वी तहानेने व्याकुळ झालेल्या हरणाने सातारा येथील मंगळवार तळ्यात उडी घेतली होती. प्राणी मित्रांच्या मदतीने त्याला वाचविण्यात यश आले. सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवराज पेट्रोल पंप परिसरात भुकेने व्याकूळ झालेला बिबट्या अन्नाच्या शोधात असताना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. एक ते दीड वर्षापूर्वी त्याच परिसरात अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ब्लॅक पॅंथरला अज्ञात वाहनाने ठोकल्यामुळे त्याचाही जागीच मृत्यू झाला होता. काही दिवसापूर्वी बछड्यासह रानगव्याने साताऱ्यात दिलेले दर्शन अनेकांना धडकी भरून जाणारे ठरले. हा घटनाक्रम पाहता भुकेने व तहानेने व्याकुळलेले वन्य प्राणी थेट मानवी अधिवासात शिरू लागले आहेत. त्यामुळे सातारकरांमध्ये वन्य प्राण्यांचे एक नवीनच भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या दोन वर्षातील वन्य प्राण्यांचा साताऱ्यातील शिरकाव पाहता वन विभागाने वर नमूद केलेल्या ठिकाणांवर वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक स्तोत्राचा वापर करून तयार केलेल्या पाणवठ्या संदर्भात आम्हा सातारकरांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वन विभागाच्यावतीने वरील नमूद केलेल्या ठिकाणी तयार केलेले पानवठे अस्तित्वात आहेत की नाहीत? त्या पानवठयांची सध्या काय परिस्थिती आहे? किती पानवठयांची दुरुस्ती करण्याची गरज आहे? याचे सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणवठे अस्तित्वात नसतील तर ते नव्याने उभारण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिवर्षी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला व परिसरात काही अपप्रवृत्ती वणवे लावून नैसर्गिक साधन संपत्तीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी गस्ती पथकांची नेमणूक करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दोन दिवसात पाहणी करणार : निवृत्ती चव्हाण
निवेदन दिल्यानंतर झालेला चर्चमध्ये निवृत्ती चव्हाण म्हणाले, शहर परिसरातील डोंगर भागात असणाऱ्या जंगलामध्ये यापूर्वी केलेल्या पाणवठ्याची पाहणी करून तसे सर्वेक्षण केले जाईल. काही कारणांमुळे पाणवठे नष्ट झाले असतील तर ते दुरुस्त करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा अहवाल त्यांच्याकडे सादर करण्यात येईल. वणव्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, पोलीस मित्र या संकल्पनेच्या धर्तीवर वन मित्र अशी संकल्पना राबविण्याचा आपला मानस असून डोंगर परिसरातील प्रत्येक गावात असे वन मित्र नियुक्त करण्याची शिफारस आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना करणार आहोत.