दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२३ । अमरावती । अमरावती येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात ‘पीएम मित्रा पार्क’ हा महाराष्ट्राचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी भूसंपादन दोन महिन्यात पूर्ण झाले असून, येथे गुंतवणूकीसाठी अनेक मोठ्या उद्योगांनी तयारी दर्शवली आहे. परदेशी गुंतवणूक व मोठी रोजगारनिर्मिती या प्रकल्पातून साध्य होणार आहे. त्यादृष्टीने येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभाराव्यात, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
‘पीएम मित्रा’ अंतर्गत नियोजित ‘मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क’च्या अनुषंगाने बैठक उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वसाहतीतील ‘सीईपीटी’ सभागृहात झाली. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, ‘सीईपीटी’चे डॉ. किशोर मालवीय, उद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य अभियंता राजेश झंजाळ, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, कार्यकारी अभियंता राहुल बनसोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की, मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कमुळे परिसरात प्रत्यक्ष १ लक्ष व अप्रत्यक्ष २ लक्ष अशी ३ लक्ष रोजगारनिर्मिती होईल. येथील वस्त्रोद्योग उद्योगाला आवश्यक असलेला कापूस याच परिसरात उत्पादित होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. त्याविषयीच्या संशोधनाला वाव मिळण्यासाठी कापूस संशोधन उपकेंद्राची निर्मिती करण्यात येईल. येथील पीएम मित्रा वस्त्रोद्योग पार्कच्या अनुषंगाने ३० मोठ्या वस्त्रोद्योग उद्योजकांसमवेत मुंबईत बैठक झाली. त्यात रेमंडसारख्या मोठ्या उद्योगांनी गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. भूसंपादन गतीने पूर्ण झाले असून, शेतकरी बांधवांना येत्या दोन आठवड्यात मोबदला अदा करण्यात येईल.
‘प्लग ॲन्ड पे’अंतर्गत छोट्या उद्योगांनाही चालना
‘प्लग ॲन्ड पे’अंतर्गत छोट्या उद्योगांसाठी १०० युनिट साकारण्याचे नियोजन आहे. त्यात ५०० चौ. मी. बांधकाम विकसित करून ५०० चौ. मी. मोकळ्या जागेसह एकूण १ हजार चौ. मी. भूखंड देण्यात येईल. छोटे उद्योजक तिथे थेट आपला प्रकल्प सुरू करू शकतील. त्याचप्रमाणे, बचत गटांच्या उत्पादननिर्मितीला चालना मिळण्यासाठी ग्रामोद्योग वसाहतही उभारण्यात येईल. त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करुन छोट्या उद्योगांना व बचत गटांना येथे उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश श्री. सामंत यांनी दिले.