भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । पुणे । भक्ती, ज्ञान आणि कर्माने स्वतः चारित्र्यवान होत चारित्र्यसंपन्न समाज आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती विद्यापीठ पुणे येथे आयोजित २६ व्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, सुनील देवधर, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, संस्थेच्या सरचिटणीस स्वाती चाटे आदी उपस्थित होते .

श्री.कोश्यारी म्हणाले, भारतात अनेक ऋषींनी काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या विचारांनी समाजाला जागृत करण्याचे कार्य केले आहे. या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देशाला वैभवशाली करता येईल. भारतीय विचारांच्या आधारे एमआयटी संस्थेने संस्कृतीच्या जागराचे सुरू केलेले कार्य मार्गदर्शक आहे.

साधू-संत, क्रांतिकारी यांचा त्याग आणि बलिदान आपल्याला देशभक्तीसाठी प्रेरित करणारे आहे. आपल्या ऋषीमुनींचे ज्ञान, वसुधैव कुटुम्बकम् आणि एकं सत चे तत्व जगाला मार्गदर्शक आहे. बौद्धिक, अध्यात्मिक आणि शारीरिक शक्तीच्या समन्वयाने जगात संतुलन स्थापित होईल, अन्यथा बलशाली राष्ट्रे इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करतील.

ज्ञानेश्वरीत मांडलेले गीतेतील ज्ञान अद्भुत आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना माणसाला जोडणारी आहे. अध्यात्माला कर्माची जोड देण्याचा गीतेत मांडलेला विचार ज्ञानेश्वरांनी सुंदरपणे मांडला आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून हे विचार समाजापर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, भारताची संस्कृती आणि ज्ञान विश्वाला मार्गदर्शक आहे. भारत ही ज्ञान-विज्ञानाची भूमी आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर समन्वय इथे आहे. याच भारतीय विचारांच्या प्रेरणेने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

श्री.देवधर, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.राहुल कराड यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात प्र.कुलगुरू मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेविषयी माहिती दिली.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते योगशिक्षक मारुती पाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!