दैनिक स्थैर्य | दि. २ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका समोर असल्यामुळे या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करणे टाळले असून कोणताही बदल करण्यात आला नाही, अशी प्रतिक्रिया फलटणचे करसल्लागार विवेक गायकवाड यांनी दिली आहे.
विवेक गायकवाड म्हणाले की, अर्थसंकल्पात कोणतेही बदल नाहीत. निवडणुकासमोर असतानाही लोकप्रिय घोषणा करणे टाळले आहे. कराच्या दरात बदल न करता पूर्वीचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २००९-१० पर्यंतची २५,००० व २०१०-११ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षांतील १०,००० पर्यंतची आयकर थकबाकी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा फायदा एक कोटी करदात्याना होईल, दोन कोटी लोकांना नवीन घरे देण्याच्या घोषणेशिवाय या अर्थसंकल्पात विशेष काहीच दिसत नाही. महागाई कमी करण्यासाठी कोणतीच पावले उचललेली दिसत नाहीत. गॅस, पेट्रोल डिझेल यासह दैनंदिन जीवनात आवश्यक कोणत्याच वस्तूंचे दर कमी केलेले नाहीत. ४०,००० हजार साध्या रेल्वे बोगी वंदे भारतमध्ये बदलल्या जाणार आहेत. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेचा विस्तार केला जाणार आहे. हे मत्स्य व्यावसायिकांना दिलासादायक आहे.