दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । मुंबई । गुणवंत विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन मिळविलेल्या यशाचे व जेष्ठ माजी कार्यकर्ते यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून बौद्धजन सहकारी संघ पेवे विभाग क्र. २ च्या वतीने गुणवंत विध्यार्थी व जेष्ठ माजी कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन किशोर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ललित कला भवन, नायगाव, दादर, मुंबई -१४ येथे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागाचे सचिव अनिल पवार यांनी केले, तर कार्यक्रमाची सुरवात मनीष पवार व साधना जाधव यांच्या सुमधुर आवाजत धार्मिक व स्वागत गीत सादर करून व बौद्धचार्य मंगेश कळंबे यांच्या सुमधुर आवाजात धम्म विधी पंचशील ग्रहण करून करण्यात आली. सदर कार्यक्रमास सर्व संलग्न शाखांचे आजी माजी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते, महिला मंडळ, विद्यार्थी, पालक आदी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संतोष जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून विभागाच्या कामकाजाचा आढावा आपल्या प्रस्ताविकेतून सादर केला व विभाग कार्यकारी मंडळाच्या हस्ते जेष्ठ माजी कार्यकर्ते व सर्व शाखांच्या उपस्थित गुणवंत विध्यार्थी, महिला/ पुरुष अध्यक्ष, सचिव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर प्रमुख वक्ते सत्यशोधक युवा समाज प्रबोधनकार ऍड. रोशन पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व श्रोत्यांना धार्मिक, सामाजिक व बहुजन समाजातील तरुणांनी भविष्यात कुठला मार्ग अवलंबिला पाहिजे या विषयांवर मार्गदर्शन केले, सोबतच संघाचे विश्वस्त संजय पवार, विश्वस्त मुकुंद पवार, माजी विश्वस्त रामचंद्र गमरे, माजी कोषाध्यक्ष रामदास कळंबे कार्याध्यक्ष दीपक मोहिते आदी मान्यवरांनी ही आपले अमूल्य विचार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सरतेशेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी धम्मदान दिले त्यांचे व विभागातील ज्या तडफदार तरुणांनी कार्यकारी मंडळाला अमूल्य सहकार्य केले अश्या रविंद्र पवार, स्वप्निल कळंबे, अमित पवार, मंगेश कळंबे, विकास जाधव, महेश सकपाळ, बंडू जाधव, सचिन मोहिते, राजेश कदम तसेच जेष्ठ पत्रकार व बौद्धजन सहकारी संघाचे विश्वस्त आदरणीय राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांचे आभार मानले व सामुदायिक शरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.