बौद्ध उपासक-उपासिकांनी धम्माच्या आचार-विचारांचे पालन करावे – चंद्रकांत मोहिते

भारतीय बौद्ध महासभेतर्फे विंचूर्णी येथे वर्षावास प्रवचन; 'बुद्ध आणि त्याचा धम्म' ग्रंथाचे वाटप


स्थैर्य, विंचूर्णी, दि. २७ ऑगस्ट : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारत बुद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यासाठी प्रत्येक बौद्ध उपासक व उपासिकेने धम्माचे आणि आपल्या आचार-विचारांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेतर्फे मौजे विंचूर्णी येथे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील दहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत मोहिते यांनी बौद्ध धम्माच्या आचरणाचे नियम आणि श्रावण पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. उपासक-उपासिकांनी पंचशीलाचे पालन करून नीतिमान जीवन जगावे. अंधश्रद्धा व कर्मकांड सोडून धम्माचे आचरण केल्यानेच आपला विकास होऊ शकतो, अन्यथा विनाश अटळ आहे, असा संदेश त्यांनी दिला. धम्म हा निर्मळ जीवन जगण्याचा एक मार्ग असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी वर्षावासाचे महत्त्व आणि हा कालखंड उपासकांसाठी किती मोलाचा आहे, हे उपस्थितांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, फलटण तालुक्याचे सुपुत्र व मुंबई येथील आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे विंचूर्णीतील सर्व बौद्ध उपासक व उपासिकांना वाटप करण्यात आले. तसेच, भारतीय बौद्ध महासभेतर्फे लहान मुलांना भारतीय संविधानाची उद्देशिका आणि वंदना सूत्रपठण पुस्तिका देण्यात आल्या.

या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संघटक विजयकुमार जगताप यांच्यासह विंचूर्णी गावातील बहुसंख्य धम्म उपासक व उपासिका उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!