बौद्ध धम्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू: विठ्ठल निकाळजे

भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेत प्रतिपादन


स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, बौद्ध धम्मात कर्मकांड किंवा अंधश्रद्धेला स्थान नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जातो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील आठवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना निकाळजे यांनी बौद्ध धम्म आणि विज्ञानातील समानता आणि फरक स्पष्ट केले. ते म्हणाले, “विज्ञान जसे प्रयोगांवर आधारित आहे, तसेच बौद्ध धम्म प्रत्यक्ष अनुभवावर भर देतो. दोन्ही कार्य-कारण संबंध मानतात आणि पूर्वग्रहांना नाकारून सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.” अल्बर्ट आईनस्टाईन यांचे “जर कोणता धर्म आधुनिक वैज्ञानिक गरजा पूर्ण करू शकला, तर तो बौद्ध धर्म असेल,” हे वाक्य उद्धृत करून त्यांनी बौद्ध धर्माची वैज्ञानिकता अधोरेखित केली.

या कार्यक्रमात धम्मगुरु भंते कश्यप (परभणी) यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील देऊन धम्मदेसना दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेतर्फे उपासक-उपासिकांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, रामचंद्र मोरे, चंद्रकांत मोहिते, विजयकुमार जगताप, संपत भोसले यांच्यासह वाठार निंबाळकर आणि परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!