दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । सातारा । बुद्ध, फुले, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय क्रांती करू शकतात, याचं धगधगते उदाहरण म्हणजे प्रणाली गुडीले… वर्षानुवर्षे भटकंती आणि मिळेल तो व्यवसाय करणाऱ्या मुळच्या वैदू समाजातील आणि सध्या बुद्ध स्वीकारलेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गुडीले यांच्या कन्येने आकाशाला गवसणी घालायची किमया करून दाखवली आहे. घरची परिस्थिती बेताची असताना त्यावर मात करत प्रणालीने वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार अत्यंत हलाकीच्या परिस्थिती तिने बी ए एम एस चे वैद्यकिय शिक्षण पूर्ण केलं आहे. तिच्या यशात तिच्या आई वडिलांबरोबरच तिचे गुरुजन, आत्या, आजी आजोबा व चळवळीतील अनेकांचा सहभाग असल्याचे प्रणाली नम्रपूर्वक सांगते.
प्रणाली ही साताऱ्यातील धम्ममहोत्सव संयोजन समितीचे निमंत्रक व साताऱ्याच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्थेचे उपाध्यक्ष असलेल्या प्रसाद गुडीले व वनिता गुडीले यांची कन्या आहे. या दोघांनीही परिस्थितीवर मात करत प्रणालीला वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या दोघांचेही मनापासून अभिनंदन करायला हवे. समाजाच्या सर्व स्तरातून प्रणालीचे अभिनंदन होत आहे.प्रणालीला तिच्या पुढील शिक्षणासाठी व करियरसाठी मनापासून हार्दिक अशा मंगल कामना…!!!!