![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/1002438622.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळावी या मागणीसाठी सोमवारी शेकडो भीमसैनिकांनी फलटण तहसील कार्यालयावर भव्य लॉंगमार्च काढला. या आंदोलनात सहभागी झालेल्या भीमसैनिकांनी जागा मिळण्याबाबत प्रशासनाने समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले असले तरी, जागेबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
फलटण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू झाले असून, जोपर्यंत बुद्ध विहारासाठी निश्चित जागेबाबत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले आहे की फक्त तोंडी आश्वासन नको, तर जागेबाबत प्रशासनाने अधिकृत लेखी पत्र द्यावे, अन्यथा ठिय्या आंदोलन तीव्र करण्यात येईल.
आंदोलनाच्या वेळी भीमसैनिक, विविध दलाचे नेते आणि अनेक समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून बुद्ध विहारासाठी योग्य जागेची मागणी केली. प्रशासनाने हे निवेदन स्वीकारले असले तरी, आंदोलकांचा असा दावा आहे की लेखी आश्वासन न मिळाल्यास आंदोलन सुरूच राहील.
यावेळी प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर फलटण बाजार समितीचे संचालक, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक, युवा नेते अक्षय गायकवाड यांनी थेट आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना फोन द्वारे सदरील मागणीची माहिती दिली त्यानंतर युवा नेते अक्षय गायकवाड यांच्या मागणीनुसार “येणाऱ्या काही दिवसात यामध्ये आपण नक्की प्रयत्न करू” असे आश्वासन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी युवा नेते अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून सर्वांना दिले.