दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । पंढरपूर । बहुजन समाज पार्टी पंढरपूर यांच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी व बामसेफचे जेष्ठ नेते एल.एस. सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी बसपाचे सोलापूर जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, दत्तात्रेय वाडेकर, गौतम साबळे, शहराध्यक्ष मनोज वनसाळे, समाधान पारसे उपस्थित होते. यावेळी रवी सर्वगोड यांनी राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या जन्मदिनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात ५०% जागा आरक्षित ठेवण्याचे धोरण अवलंबिले होते. भारतामध्ये आरक्षणाची सर्वप्रथम सुरुवात शाहू महाराजांनी केली. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब व बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांनी “आरक्षणाचे शताब्दी वर्ष” 2002 साली कोल्हापुरात साजरे केले होते. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे कुर्मी परिषदेमध्ये शाहू महाराजांना “राजर्षी” पदवी कुर्मी समाजाकडून बहाल करण्यात आली होती, त्या ऐतिहासिक स्थळाला उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी राष्ट्रीय स्मारक करण्याचा व उत्तर प्रदेशात शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेस आणि भाजपाने आरक्षण अंमलबजावणी बाबत सतत बहुजन समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण असो, मंडल आयोगाची अंमलबजावणी असो, पदोन्नतीतील आरक्षण असो, इत्यादी विषयामध्ये काँग्रेस, भाजपाने बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचे काम केले. राज्यसभेत बहुजन समाज पक्षाच्या पाठपुराव्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण विधेयक पारित झाले, परंतु काँग्रेस, भाजपा जाणीवपूर्वक पदोन्नतीतील आरक्षण विधेयक राज्यसभेत पास करू घेतले जात नाही. पदोन्नतीतील आरक्षणाचा तीडा लोकसभेत अडकून पडलेला असताना महाराष्ट्रातील भाजपा,काँग्रेस एकमेकाकडे बोट दाखवण्याचे काम करत आहे. वास्तवता लोकसभेत प्रलंबित असलेले पदोन्नतीतील आरक्षण बिल काँग्रेस भाजपा मिळून बस्तानात बांधून ठेवत आहेत. शाहू महाराजांच्या संकल्पनेतील आरक्षणाला छेद देण्याचे काम काँग्रेस भाजपा मिळून करत आहे. काँग्रेस भाजपाच्या करणी-कथनी मध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कायदेमंडळात आरक्षणा संदर्भात चर्चा न करता, रस्त्यावर नौटंकी करण्याचे काम कॉंग्रेस भाजपा करत आहे असे मनोगत उपस्थितांसमोर व्यक्त केले.